Tuesday, January 29, 2019

शिक्षित आणि सुशिक्षित

एक खूप शिकवून जाणारा सामान्याकडून मिळालेला असामान्य अनुभव. सुसंस्कृतपणा सुसंस्कृतपणा म्हणजे तरी आणखी दुसरं काय हो !

आज एका रिक्षावाल्या काकांचा मला खूप भारावून टाकणारा अनुभव आला. पांढरी टोपी, कपाळावर मध्यभागी, कानाच्या पाळ्यांवर आणि गळ्याच्या मध्यभागी अबीर बुक्क्याचा टिळा लावणारे हे ‘माळकरी’ काका. रिक्षाचे रु. अठरा झाले होते. मी त्यांना वीस रुपयांची नोट दिली, त्यांच्याकडे दोन रुपये सुटे नव्हते, ते इथे तिथे शोधीत होते, मी म्हणालो, काका जाऊंद्या हो, राहूंद्या. पण त्यांनी फक्त थांबा असा हात केला, रिक्षातून उतरून बाजूच्या पानवाल्याच्या टपरीवरून दहा रुपयाचे सुट्टे आणले, आणि मला दोन रुपये परत दिले आणि एवढंच म्हणाले, “आतां कसं पद्धतशीर जहालं कीं न्हाई ? येतूं बरं कां, राम राsssम”. रिक्षा सुरू करतांना फक्त गोड हसले आणि निघून गेले, मी त्यांना नमस्कार केला आणि त्या गेलेल्या रिक्षाकडे मिनिटभर नुसता बघतच बसलो.   

मला लगेच माझीही एक खूप जुनी एसटी स्टँडवरचीच एका आजींची शहाण्याला खूप काही शिकवून जाणारी घटना आठवली. या निमित्ताने मी ही पोस्ट मी पुन्हां देत आहे. 

खूप खूप वर्षांपूर्वी मी अशाच एका पावसाळी दिवसांत लोणावळा एसटी स्टँडवर एका खूप गरीब आणि खूप म्हाताऱ्या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटीकडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यांत मी त्या म्हाताऱ्या आजीला निरनिराळ्या एसटी बसेसमध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येतांना पाहिलं. आमच्या एसटीत तिला मी दिसतांच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली, “भ्येटला रं तूं, लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं कीं तुज पैसं देण्यासाठी आतां फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग!”

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजाऱ्याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो. मी तिला विचारलं ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग, आनी बाजूची म्हतारी हाय कीं लक्ष ठिवायला”. मी विचारलं, आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?” त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला कां पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यांत आपण पुण्य करतोय कीं पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !

एसटी सुटायला अजून वेळ आला होता. मी मनांत म्हटलं कीं अजून जरा आजींकडून कांही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला विचारलं “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवूं” ? मी तुला तुजं चार आनं तुला दिलं, आतां मी सुटले बग”. मी निरुत्तर झालो. तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला, कीं माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, आणि हे शिक्षण तिला मिळालं असणार तिच्या खेड्यात नित्यनियमाने होणाऱ्या आणि मोठ्या विश्वासाने आणि भक्तिभावाने ऐकल्या जाणाऱ्या भजन, कीर्तन, प्रवचनातून. मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती. 

- सुभाष जोशी, ठाणे.